Chhatrapati Sambhajinagar : सात परीक्षा केंद्रांवर छापा, विद्यापीठाच्या नियमबाह्य व्यवस्थेवर कुलगुरूंचा कडक इशारा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू असून, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी शहरातील सात परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देत मोठी कारवाई केली आहे. या धडक तपासणीमध्ये तब्बल १२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले असून, बीडमधील एका केंद्रावर तर तब्बल ३६ विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळले.
केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांना फटकारले
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कुलगुरूंनी संबंधित केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढली. फुलारी यांनी स्पष्टपणे सांगितले की, नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही आणि याच कारणास्तव सर्व संबंधित विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
नियमबाह्य परीक्षा व्यवस्था
या छाप्यावेळी कुलगुरूंसोबत भरारी पथकातील डॉ. सतीश दांडगे व डॉ. सचिन भुसारीही उपस्थित होते. अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यापीठाने ठरवलेल्या नियम व अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या महाविद्यालयांवर कारवाई
फुलारी यांनी एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., बी.एड., बीपीएड अशा विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. व्ही. एन. पाटील महाविद्यालय, एम.पी. लॉ कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, राजेश टोपे फार्मसी, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, वाय. बी. चव्हाण फार्मसी महाविद्यालय आदी केंद्रांवर १२ विद्यार्थ्यांकडून कॉपी होत असल्याचे आढळले.
'मास कॉपी'चा प्रकार उघड
सकाळच्या सत्रात पाथरी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात दोन परीक्षा हॉलमध्ये 'मास कॉपी'चा धक्कादायक प्रकार उघड झाला. या संपूर्ण घडामोडीमुळे विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले असून, भविष्यातील परीक्षा पारदर्शक आणि नकलविरहीत होण्यासाठी कठोर उपाययोजना राबवली जाणार असल्याचे संकेत कुलगुरूंनी दिले आहेत.